गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

सहज


 कविता 

मन संवेदनशील असलं की त्याची जाणीव चांगली असते म्हणूनच ते मन कुठलेही काम व्यवस्थित पार पाडत असते. कविता करणे हेही तशाच मनाचं काम आहे. माणूस कविता करायला लागला, की सर्वसाधारणपणे तो वाया गेला असं बोललं जाते. तसं ते काव्यात्मक दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्याही काही अंशी खरच बोलत असतात; कारण कविता करू लागलेले सर्वच माणसे कायमचेच कवी बनून जातात असं होत नाही.


 असा एखादाच उगवतो जो पुढे श्रेष्ठ आणि जेष्ठ कवी म्हणून मान्यता पावतो. ज्याच्या कविता खरोखर मनाचा ठाव घेतात. ज्याच्या कवितेत अस्सल काव्य सापडते, जी वाचली ऐकली की आपसूकच मनातून दाद निघते...'वाह!' काव्यात्मकतेला हाडाचे रसिक नीट ओळखतात. मनोहारी सौंदर्याला खरे रसिक डोक्यावर घेतात. 

 

बहुतेक लोक कविता करतात पण तो कवी म्हणून कायम टिकत नसतो कारण कविता एक सहज गोष्ट आहे आणि आपणही करू शकतो एवढंच दाखवण्यासाठी ते कविता लिहू लागतात पण फक्त दाद मिळवण्यासाठीच लिहिली जाते ती कविता असत नाही. नागपूरचे जेष्ठ कवी नीलकांत ढोले यांचा एक शेर आहे.


गुंफूनिया शब्द काही सिद्ध का होई गजल?

ती तुम्हाला काळजाचे रक्त ताजे मागते.


काळजाचं रक्त मागणारी ही कविता एवढी क्रूर आहे का? तिच्या भाषेत असेलही, तेव्हाच ती तशी अलिप्त राहून सुंदर बनली आहे.


केशवसुत कवितेला आकाशाची वीज म्हणतात. इतकी ती भयावह आहे. असं ते का म्हणाले असेल? कारण ती आहेच तशी... पण नव्या दमाच्या व समर्पणास तयार असणाऱ्या माणसांनी ह्या वाक्याला घाबरण्याचे कारण नाही. ते भय संत तुकाराम दूर सारतात.

खऱ्या कवीच्या हृदयाची अवस्था सांगताना ते म्हणतात


“अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना”


....पण करिता सायास सगळेच गवसते फक्त तेवढे समर्पण हवे


पण हार न जाता आपण स्वतःचे मनोबल वाढवत असणें खूप गरजेचे आहे. हे फक्त कवितेच्याच नाही तर जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आवश्यक आहे. 


आपण जेव्हा आंबे पाडायला जातो आणि ते पाडायला आपल्याला इतर कोणतेही साधन असत नाही तेव्हा आपण दगडांचा उपयोग करतो. त्यासाठी खूपसे दगड गोळा करतो, मारतो. पण त्या दगडांपैकी प्रत्येकच दगड आंबा पाडण्याच्या उपयोगी येत नाही. म्हणून आपण दगड मारणे सोडतो का? एखादाच योग्य दिशेने जाऊन त्या आंब्याला लागतो आणि त्याचं सार्थक होते. म्हणून काही असफल ठरलेल्या दगडांचे महत्व कमी होत नाही उलट त्यांनीच त्या दगडाला योग्य दिशा दिली असा त्याचा अर्थ होतो.


तर आपली जेवढी ताकद आहे तेवढं आपण करायचं, शेवटी वेळ आणि रसिक सांगतीलच आपण काय करतो ते, पुढे  कुठवर करायचं ते ! तसेही आपल्यालाच आपली ताकद कळते. अशी एक वेळ येते, तेव्हा अलगद बाजूला सरायचं! तोवर लगे रहो! 


कारण जीवनात कविता नसेल, सौंदर्य नसेल तर जगण्यात मजा नाही. म्हणून जमते तोवर कविता करा! मस्त कविता करा! शेवटी चांगली असेल ती कायम टिकून राहील! हे फक्त कवीसाठीच नाही तर तुमच्या आवडीची जे जे क्षेत्रे असतिल त्यासाठी अशीच तयारी ठेवा, टिकून राहण्याची!


-मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहज

  कविता  मन संवेदनशील असलं की त्याची जाणीव चांगली असते म्हणूनच ते मन कुठलेही काम व्यवस्थित पार पाडत असते. कविता करणे हेही तशाच मनाचं काम आहे...